इच्छामरण

आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नेवासा | मंगेश निकम – सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादनामुळे विस्थापीत बनलेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पन्नास वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही प्रलंबित असून त्यांच्यावर आमरण उपोषण तसेच इच्छामरण मागण्याची दुर्दैवी वेळ ओढवणे हे निव्वळ संतापजनक असल्याची टिका आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेने पुनर्वसन प्रक्रियेत केलेल्या दिरंगाईमुळे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांची पुरती वाताहत झाली असल्याने त्यांना या पन्नास वर्षांच्या कालावधीची नुकसान भरपाई देऊन त्यांची पुनर्वसन प्रक्रिया नियमानुसार पूर्ण तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

जायकवाडी प्रकल्पग्रस्त खर्डे कुटुंबाची पन्नास वर्षांवर कालावधी उलटून जाऊनही पुनर्वसन प्रक्रिया प्रलंबित असल्याने या प्रक्रियेचे नियमानुसार लाभ मिळावेत यासाठी त्यांचा वर्षानुवर्षे पाठपुरावा सुरु आहे. पुनर्वसन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे गेल्या पन्नास वर्षांत खर्डे कुटुंबाची पुरती वाताहत होऊनही संबंधित यंत्रणेकडून कागदी घोडे नाचविण्यापलीकडे ठोस कार्यवाही केली जात नसल्याने कंटाळून या कुटुंबावर दोन महिन्यांत दुसऱ्यांदा आमरण उपोषणास बसण्यासह इच्छामरणाची परवानगी मागण्याची दुर्दैवी वेळ ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजु आघाव तसेच सचिव प्रवीण तिरोडकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन वस्तुस्थिती समजावून घेतली.

शासकीय यंत्रणेच्या गलथानपणामुळेच खर्डे कुटुंबाची वाताहत झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबरच पुनर्वसन प्रक्रियेतील दिरंगाईबद्दल त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन जिल्हाव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजु आघाव, शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, प्रकाश फरताळे, प्रा.अशोक डोंगरे, सोमनाथ कचरे, भैरवनाथ भारस्कर यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले.

One thought on “प्रकल्पग्रस्तांवर ओढवलेली इच्छामरण मागण्याची वेळ दुर्दैवी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *