नेवासा | अभिषेक गाडेकर सद्गुरू किसनगिरीजी बाबांचे सान्निध्य लाभलेल्या परंतु दुर्लक्षित राहिलेल्या नेवासा बाजार तळावरील श्री दत्त मंदिराला आ शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून नवी झळाळी लाभली असून या कायापालटाचा प्रथम वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साही धार्मिक वातावरणात संपन्न झाला. नेवासा शहरातील बाजारतळ परिसरात असलेले श्री दत्त मंदिर 1955 पासून स्थायिक आहे. त्या काळामध्ये श्री सद्गुरू किसनगिरीजी महाराज या मंदिरात येऊन बसत असल्याचे जुने जाणते सांगतात. सुडके नामक भाविकाने मोठ्या श्रध्देने या मंदिरात श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना करून पूजा अर्चा व देखभाल करत होते. तेथे एकदम छोटेसे 2×2 चे मंदिर अस्तित्वात राहिले.

ग्रामस्थांनी मंदिरचा जीर्णोध्दार करण्यासाठी पुढाकार घेतला. मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम प्रत्यक्षात सुरू करून त्यासाठी आपापल्या शक्तीनुसार लागणारी जेवढी होईल तेवढी मदत केली. मंदिराचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराला सभा मंडपाची गरज भासल्याने आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे भाविक तसेच ग्रामस्थांनी मदत मागितली. आमदार गडाख यांनीही कशाचाही विचार न करता सभामंडपासाठी सात लाख रुपयांचा भरभक्कम निधी मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. आमदार गडाख यांनी व्यक्तिशः लक्ष घातल्याने अवघ्या दीड महिन्यांच्या कालावधीत सभामंडपाचे काम पूर्ण होऊन मंदिराच्या वैभवात भर घालत आहे.

आ शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून 72 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे बाजारातळ परिसरात काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याने मंदिराचा परिसर आपोआपच सुंदर, स्वच्छ बनत आहे. दर गुरुवारी या मंदिरात महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम होत असतो. भाविक विविध प्रकारचे पदार्थ प्रसाद स्वरूपात देतात. सर्व नेवासकर ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम असाच चालू आहे. या मंदिराच्या जीर्णोध्दाराला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आ शंकरराव गडाख यांनी दत्त भक्तांसह भेट देऊन दत्तात्रय भगवंताचे दर्शन घेतले व मंदिर परिसराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे म्हणाले. यानिमित्ताने या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन भंडाराच्या कार्यक्रमात अडीच ते तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दत्त मंदिर परिसरात आ शंकरराव गडाख यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने मंदिर परिसरात विकासकामे मार्गी लागले आहेत दत्त भक्तांनी व नागरिकांनी आ शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *