Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : सोनईत संवाद मेळाव्यास 10 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती.

Uddhav Thackeray | राहुल राजळे – जगदंबा देवी मंदिर प्रांगण सोनई येथे आ शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातुन मंगळ दि 13 फेब्रुवारी 2024 रोजी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत 10 हजार कार्यकर्ते शिवसैनिक यांचा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले सोनईचे ग्रामदैवत असलेले जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात उद्धव ठाकरे यांची उपस्थितीत सभा होते आहे. वर्षात दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे सोनईला आले आहेत. सोनईची जगदंबा माता तुम्हाला लढण्यास बळ देणार आहे. मुख्यमंत्री पदाच्या काळात कुठलीही निवडणूक नसताना देखील शेतकरी बांधवांसाठी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही राज्यातील शेतकरी बांधव कधीही विसरू शकत नाही.

कोरोना काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कुटुंब प्रमुखाप्रमाणे राज्यातील नागरिकांची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली काळजी यामुळे अनेकांना जीवदान लाभले. शिर्डी लोकसभा मतदार संघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याला नेवासा तालुक्यासह सर्वच मतदार संघातून लीड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आ गडाख म्हणाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले सर्वाधिक गर्दी असलेली उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची सभा सोनईत होत आहे ही बाब विशेष कौतुकाची आहे. ज्यांना अनेक पदे दिली असे लोक सोडून गेले तरी जनता ठाकरे बरोबरच राहणार आहे.

याप्रसंगी बोलतांना खा संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे यांना आ शंकरराव गडाख यांनी साथ दिलेली आहे हे योगदान आम्हीही कधीही विसरणार नाही. आ गडाख यांनी लहान भाऊ लक्ष्मणाप्रमाणे ठाकरे यांना साथ दिली आहे. सभेला उपस्थित असलेली गर्दी हे गडाख यांच्या संघटन कौशल्याचे यश आहे. आ गडाख हे मोठी क्षमता असलेले नेतृत्व आहे असे राऊत म्हणाले. याप्रसंगी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले सध्या माझ्याकडे काहीही तुम्हाला काहीही देण्यास नसतांना देखील हजारो बांधव माझ्या सभेला उपस्थित आहेत आपली उपस्थिती मला जिद्दीने लढण्यास बळ देणारी आहे.

आ शंकरराव गडाख यांच्या रूपाने तुमच्या सारखी मनस्वी प्रेम करणारी माणसे मला भेटली आहेत. सत्ता येते व जाते पण माणसाचे प्रेम महत्वाचे आहे. सरकारमध्ये शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली याचा मनाला अभिमान आहे. सत्ता बदल झाल्यावर मंत्री पदाची संधी असतानाही आ शंकरराव गडाख यांनी साथ सोडली नाही. राज्यात शेतकरी बांधवांच्या विविध समस्या असतांना सत्ताधारी इतर पक्ष फोडण्यास व्यस्त आहेत येणाऱ्या निवडणुकीत जनता दलबदलुना जागा दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेला महाराष्ट्र कुठल्याही हुकूमशाहीला बळी पडणार नाही. सोन्या सारखी पिके आणून देखील पीक कवडी मोल भावाने विकावे लागत असल्याने शेतकरी बांधव देशोधडीला लावण्याचे काम सरकार करत आहे याचे उत्तर जनता आगामी निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही.(Uddhav Thackeray)

हक्कासाठी शेतकरी दिल्लीला जाऊन धडकला तरी सरकार ला त्यांच्याकडे पाहण्यास वेळ नाही. पोलिसांकरवी दिल्लीत न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर अश्रूधुराचा मारा केला जातोय हे लोकशाहीला घातक आहे. एक रुपयात पीक विमा देण्याचा नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. पंतप्रधान हे निवडणुका आल्या की गोड भाषणे करून जनतेची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे.सध्याच्या सरकारची अवस्था मला नाही अब्रू व मी कुणाला घाबरू अशी झाली आहे. कट्टर भाजप व आर एस च्या जुन्या कार्यकर्त्यांना देखील दुसऱ्या पक्षाला फोडणे मान्य नसल्याचे ते म्हणाले. आमचे हिंदुत्व हे जनतेच्या घरात चुली पेटवणारे आहे.(Uddhav Thackeray)

शिर्डी मतदार संघात गद्दारी करून गेलेल्या खासदाराने निवडणुकीला उभे राहूनच दाखवावे असे आवाहन खा लोखंडे यांना भर सभेत उद्धव ठाकरे यांनी केले. निष्ठा काय असते हे आ शंकरराव गडाख यांनी संकट काळात दाखवून दिले आहे हे मी कधीही विसरणार नाही. सोनईच्या जगदंबा मातेचा आशीर्वाद व जनतेची साथ घेऊन संकटावर मात करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

उपस्थितांचे स्वागत आ शंकरराव गडाख व सुनीलराव गडाख यांनी केले. याप्रसंगी युवासेनेचे वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर,युवा नेते उदयन गडाख ,डॉ निवेदिता गडाख,शुभांगी पाटील,मा खा भाऊसाहेब वाकचौरे,रावसाहेब खेवरे,प्रा शशिकांत गाडे,भगवान फुलसौंदर,संभाजी कदम,विक्रम राठोड,राजेंद्र दळवी,संदेश कार्ले, मच्छिंद्र म्हस्के ,हरीभाऊ शेळके,पंकज लांभाते यासह नेवासा तालुक्यातील गाव ,गावातून आलेले विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सभा स्थळी जय भवानी ,जय शिवाजी कोण आला रे कोण आला या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *