Ahmadnagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Ahmadnagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांकडून सुमारे ५ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक दुचाकी जप्त केली.

याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात म.पो.ना. अविंदा विठ्ठल जाधव (वय ३३) यांच्या फिर्यादी वरून अजय मधुकर पुरके (वय ३०), रा. पिंपळगाव भोसले,ता. आर्वी, जि. वर्धा आणि अनिल रघुनाथ देसाई (वय ३३), रा. सातारा हल्ली दोघे रा. जयभवानी नगर, कोथरूड, पुणे, या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील कोळगाव परिसरात नगर-दौंड रस्त्यावरील एका हॉटेलवर दोघांकडून सोमवारी (दि. २६) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाण्याची बॉटल विकत घेत बनावट नोट चलनात आणली.

मात्र, हॉटेल चालकाला दिलेली नोट बनावट असल्याचे लक्षात येताच हॉटेल चालकाने दोघांचा पाठलाग केला असता, ते तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या एका हॉटेलवर बनावट नोटा देऊन वस्तू विकत घेताना रंगेहाथ पकडले.याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली त्यांच्याकडे बनावट नोटांची १००, २००, आणि ५०० रुपयांची बंडले आढळून आली. नागरिकांनी बेलवंडी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची दुचाकी तसेच ५ लाख ८० हजार रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल जप्त केले.

याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी पुणे येथील कोथरूड परिसरात बनावट नोटा तयार केल्याची माहिती दिली.पोलिस निरीक्षक संतोष भंडारे आणि त्यांच्या पथकाने कोथरूड येथील रूमवर जाऊन बनावट नोटा तयार करण्याचे प्रिंटर तसेच इतर साहित्य जप्त केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *