शिवलीलाताई पाटील

नेवासा | सुधीर चव्हाण – नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने प्रसिध्द समाज प्रबोधनकार व कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला नेवासेनगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आज ज्याचा प्रचार जास्त तिथंच लोक जास्त दिसतात असे चित्र दिसते,माझ्या माऊलींच्या पैस खांबाचे महत्व सांगणारे नेवासा तीर्थक्षेत्र जगाला कळण्यासाठी प्रयत्न करा हे तीर्थक्षेत्र मोठे होण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी यावेळी बोलताना केले. श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ यांच्या सौजन्याने मराठा बोर्डिंगच्या प्रांगणात आयोजित कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी बोलतांना हभप शिवलीलाताई पाटील म्हणाल्या ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिथे ज्ञानेश्वरी सांगितली ती भूमी पवित्र आहे,भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला ती हीच भूमी आहे, संत ज्ञानेश्वर माऊली जे भगवान विष्णूंचे अवतार आहे त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना याच क्षेत्री केली म्हणून ज्ञानेश्वरी हीच आमची माय असून नेवासा हे ज्ञानेश्वरीचे गाव असल्याने ते माझे माहेर असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आज जी तीर्थक्षेत्र मोठी झाली त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रचार झाला म्हणूनच लोक तेथे गर्दी करतात,तीर्थक्षेत्र ही सर्व सारखीच आहे,जिथे माऊलींनी पैस खांबास स्पर्श केला,पाठ लावली अशा खांबाला वारकरी माऊलींचे रूप मानतो,माऊलींच्या खांबाचे मंदिर सर्वांना कळावे म्हणून नेवासा तीर्थक्षेत्र देखील मोठे कसे होईल यासाठी प्रयत्न करा असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.सर्व उपस्थित महिलांसह भाविकांना मंत्रमुग्ध करतांना त्या पुढे म्हणाल्या की आज आपण विज्ञान विज्ञान करतो. मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींनी साडे सातशे वर्षापूर्वीच ९० टक्के विज्ञान आम्हाला ज्ञानेश्वरीत सांगितले म्हणून ज्ञानेश्वरी महान ग्रंथ ठरला आहे, भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्ञान असणारे ज्ञानोबाराय हे आहेत,म्हणून ज्ञानेश्वरी कळली नाही तरी चालेल मात्र ज्ञानेश्वरी जीवनात वाचा,ज्ञानेश्वरीला तुम्ही कळले तरी आपल्या जीवनाचे कल्याण होईल असा संदेश त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

भगवंतांच्या नामस्मरणात मोठी ताकद असून नामस्मरण हे पुण्य देणारे आहे,जीवनात पुण्य मिळविण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण करा,दान करतांना त्याचा बोभाटा न करता दान करा,जीवनात आनंद घ्यायचा असेल तर काकडा आरती हरिपाठ नित्यनेमाने करा,वेदांचा सार व उपनिषदांचा अनुवाद व सर्व तत्वे ज्ञानेश्वरीत असल्याने जीवनात ज्ञानेश्वरीचे पारायण करा आजच्या काळात आईची जागा मोबाईलने घेतली असल्याने मुलांवर चांगले संस्कार करण्याचे काम आईवडीलांनी करावे,मुलांनी देखील आईवडीलांचा सन्मान करावा आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने हभप शिवलीलाताई पाटील यांचे संतपूजन करण्यात आले.

सदर कीर्तन प्रसंगी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.प्रा.देविदास साळुंके सर यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित भाविकांचे आभार मानले. किर्तनानंतर माऊलींची कर्मभूमी असलेल्या पैस खांब मंदिरासह भगवान विष्णूंचे स्त्रीरूप दर्शन असलेल्या श्री मोहिनीराजांच्या मंदिरात जाऊन शिवलीलाताईंनी दर्शन घेतले येथे ही शिवलीला ताईंचा सन्मान करण्यात आला.दोन्हीही देवालये भगवान विष्णूंचेच रूपे असल्याने त्यांनी दर्शन घेत या भूमी बद्दल समाधान व्यक्त केले.यात्रा कमिटी सदस्य व आमदार शंकरराव गडाख यांच्या सौजन्याने कीर्तन सोहळा हा उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल शिवलीला ताईंनी सर्व सदस्यांचे कौतुक केले तर नेवासकर नागरिकांनी धन्यवाद देत आभार मानले.

3 thoughts on “श्री मोहिनीराज यात्रा उत्सव निमित्त आयोजित ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला नेवासेनगरीत उत्स्फूर्त प्रतिसाद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *