मराठा

नेवासा | सुधीर चव्हाण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्व.ओम मोहन मोरे या तरुणाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले असून  सरकारने मोरे कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून सकल मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नेवासा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सध्या मोठा लढा चालू असून अनेक तरुण केवळ आरक्षण नाही म्हणून शिक्षण व नोकरी गमावून बसत आहेत, मराठा कुटुंबातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव नाही. शेतकरी व तरुण आज पूर्णपणे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यामुळेच महाराष्ट्र भर सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मोठा लढा उभा राहिला आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. ०९ मार्च २४ रोजी रात्री ९ वा. बजाजनगर वाळूज येथील स्व.ओम मोरे या अवघ्या वीस वर्षीय तरुणाने हताशपणे छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर मार्गावरील प्रवरासंगम येथे स्व. काकासाहेब शिंदे सेतु वरून गोदावरी-प्रवरा नदीच्या संगमावर पाण्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्व. ओम मोरे याने आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

यापूर्वी देखील २३ जुलै २०१८ रोजी याचं पुलावरून याच मागणीसाठी गंगापुर तालुक्यातील आगार कानडगाव येथील स्व. काकासाहेब शिंदे यांनी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भर या मागणीसाठी वणवा पेटला ती धग आजपर्यंत कायम आहे. यापुढे सरकारने मराठा समाजाचा आता अंत बघू नये, मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनाने त्वरित कार्यवाही सुरु करावी व स्व. ओम मोरे यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

सदरचे निवेदन तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी कुणबी मराठा महासंघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अनिल ताके,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सौ. निलिमाताई वाबळे, तालुकाध्यक्ष भारत बेल्हेकर,महिला आघाडीच्या शहराध्यक्षा  सौ.जयश्रीताई शिंदे,तालुका उपाध्यक्ष बद्रीनाथ चिंधे, संदीप दरंदले, उपाध्यक्ष उज्वला गवळी,सौ.उषा संजय मारकळी,श्रीमती लीलाताई मारकळी,अशोक वाबळे, दिलीप शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *