ग्रामपंचायत

कार्यकारी अभियंताच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित..

नेवासा | सुधीर चव्हाण दोन वर्षांपासून थकलेली एकूण चाळीस लाखाची कराची थकबाकी न भरल्याने नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नेवासा बुद्रुक येथे असलेल्या सबस्टेशनला गुरुवारी दि.१४ मार्च रोजी सकाळ ११ च्या सुमारास टाळे ठोकण्यात आले. ग्रामपंचायत व ग्रामस्थ महिलांनी केलेल्या अभिनव आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले.महापारेषणचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. महापारेषण १३२ के व्ही सबस्टेशन च्या प्रांगणात झालेल्या या आंदोलनाचे नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतचे मार्गदर्शक प्रकाश सोनटक्के,माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे,उपसरपंच बाळासाहेब जायगुडे,माजी उपसरपंच सचिन धोंगडे, भानुदास रेडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.१३२ के व्ही सबस्टेशनला टाळे ठोकण्यापूर्वी प्रकाश सोनटक्के,उपसरपंच बाळासाहेब जायगुडे,सचिन धोंगडे यांनी येथील कर्मचाऱ्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून असलेल्या थकबाकी बाबत रोखठोक भूमिका मांडली.

यावेळी बोलताना ग्रामपंचायतचे मार्गदर्शक प्रकाश सोनटक्के म्हणाले की नेवासा बुद्रुक येथील जागेवर १३२ के व्ही सबस्टेशनकडे सन २०२२/२३ रुपये दोन लाख व सन २०२३/२४ चा कर दोन लाख असा एकूण चाळीस लाखाची कर बाकी असून तो अद्याप ही भरलेला नाही, या संदर्भात गटविकास अधिकारी नेवासा पंचायत समिती यांच्याकडे कार्यकारी अभियंता यांनी अपील केले होते याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतच्या बाजूने निकाल दिला होता,याबाबत काहीही ठोस कारवाई महा पारेषणच्या अधिकाऱ्यांनी केली नाही मात्र ग्रामपंचायतकडे एक ते दीड लाखाच्या थकबाकीबाबत त्यांनी कारवाई करून गावास वेठीस धरण्याचे काम केले. महापारेषण कडून ग्रामपंचायतला चाळीस लाख रकमेचा भरणा केल्यास आम्ही देखील आमची बाकी त्वरित भरू शकतो असे सांगितले.

मात्र गावातील कनेक्शन कट करून कारवाई केल्याच्या निषेधार्थ आम्ही महा पारेषणच्या १३२ के व्ही च्या सबस्टेशनला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करत आहे. आम्हाला याबाबत चाळीस लाख थकबाकी भरणा करण्याबाबतचे लेखी उत्तर आल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असे स्पष्ट केले.टाळे(सील)ठोकण्याबाबतचे दि.१३ मार्च २०२४ च्या निवेदन आम्ही कार्यकारी अभियंता अतिउच्च दाब संरक्षण व सुरक्षा विभागाला दिले असल्याचे प्रकाश सोनटक्के यांनी यावेळी बोलताना सांगितले. गुरुवारी दि.१४ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली मात्र त्यांचे लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे सांगत सबस्टेशनला टाळे(सील)ठोकण्यात येऊन सबस्टेशनच्या प्रांगणातच ठिय्या मांडण्यात आला. टाळे (सील) ठोकल्यानंतर सबस्टेशन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.

यावेळी झालेल्या ठिय्या आंदोलनात ग्रामपंचायतचे मार्गदर्शक प्रकाश सोनटक्के,उपसरपंच बाळासाहेब जायगुडे, माजी उपसरपंच भानुदास रेडे,माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे,सचिन धोंगडे,पोलीस पाटील दिलीप गायकवाड,राजेंद्र मारकळी,चेअरमन राजेंद्र यादव, शिवा साप्ते,अनिल चांदणे,अक्षय वडागळे,अनिता बोरुडे, लंका चांदणे,बाळू शिंदे,अंकुश बडे,रितेश गायकवाड, आदेश चांदणे,चंदा चांदणे,मंगल चांदणे,रुपाली चांदणे, शालिनी चांदणे, स्वाती चांदणे,सुरेखा गायकवाड, लंका वडागळे,सुनीता कणगरे,अनिता कणगरे,राऊबाई कनगरे, शीतल चांदणे यांच्यासह यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.एक तासाच्या ठिय्या आंदोलनंतर महा पारेषणचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी सदरची रक्कम पंधरा दिवसात धनादेशाद्वारे देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर एक तासाने महापारेषणचे कार्यालय खुले करण्यात आले त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *