खून

पाचेगाव | अशोक तुवर – पहाटे झोपेत असताना एका हॉटेल चालकाचा डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आल्याची घटना श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉलजवळ बेलपिंपळगाव(ता.नेवासा) शिवारात बुधवारी(दि.१३) पहाटे घडली. सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली.बाळासाहेब सखाहरी तुवर(वय अंदाजे ६०) रा. कारवाडी(पाचेगाव) ता. नेवासा असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉल नजीक ओम साई नावाने ते हॉटेल चालवीत होते. बुधवारी(दि.१३ मार्च) पहाटेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून घटनेचा तपास सुरु होता. दुपारी न्यायवैद्यक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाच्या शेजारील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे.

बाळासाहेब तुवर हे हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.दुपारी चार वाजता त्यांच्यावर पाचेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक विजय भोंबे, बिट हवालदार बबन तमनर, सुमित करंजकर, पोलीस नाईक आप्पासाहेब वैद्य, राहुल गायकवाड हे घटनेचा तपास करत असून दुपारपर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *